दुष्काळग्रस्तांच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, चारा छावण्या सुरू न झाल्याने पशुपालक अडचणीत

Foto

औरंगाबाद- यंदाची तीव्र दुष्काळी स्थिती पाहता शासनाने पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा ऑक्टोबर महिन्यातच केली, परंतु पशुगणनेच्या कारणाने अडीच महिने उलटून गेले तरी सुद्धा चारा छावण्या सुरू करण्याच्या हालचाली दिसून येत नसल्याने या दुष्काळात चारा छावण्या सुरू होणार किंवा नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

 

यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने पुरेसा जलसाठा निर्माण झाला नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. पिकेसुद्धा करपल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध झाला नाही. या पशुधनाला वाचण्यासाठी पशुपालकांनी शासन दरबारी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली. 

 

शासनातील संबंधित जबाबदार मंत्र्यांनी ही मागणी मोठ्या मनाने मान्य केली, परंतु कोणत्या गावात किती जनावरे आहेत, यांची गणना केल्या नंतरच तेथे छावणी सुरू करण्यात येईल, अशी अट घातली व कुत्रा वगळता सर्वत्र जनावरांची गणना करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्फत पशुगनना करण्यासाठी टॅब मशिन्स पुरवल्या परंतु त्यातील सिमकार्ड पुरवण्यासाठी तब्बल दीड महिना लावला. त्यानंतर पशुगणना सुरू झाली. आता ही गणना कधी पूर्ण होईल व त्यानंतर चारा छावण्या  कधी सुरू होईल, अशी स्थिती निर्माण झाल्याने ही प्रक्रिया लालबस्त्यात अडकली आहे, असे बोलले जात आहे.